Thursday, June 18, 2020

आपल्या अद्वितीय कामगिरीने सांगलीकरांची मने जिंकणारे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत साहेब

सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सर्वाधिक काळ कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी
पदोन्नतीने जळगाव जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!
🖋️अमोल शिंदे🖋️
9420453475

एखादी व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यावर तिचे पाय जमिनीवर असतील तर ती अधिकारी व्यक्ती खऱ्या अर्थाने जनसामान्यांना न्याय देते. याचे मूर्तिमंत उदाहरण आदरणीय अभिजीत राऊत साहेब...

काम करत असताना व्यवस्थेतील शेवटच्या घटकाचा व शासकीय व्यवस्था खऱ्या अर्थाने ज्या घटकासाठी कार्य करणे अपेक्षित आहे. त्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांच्या दालनाचे दरवाजे सदैव सर्वासाठी उघडी होती. येणारे कोणी बडे व्यक्तिमत्व असो की अगदी सामन्यातील सामान्य व्यक्ती सर्वांना समान वागणूक हे साहेबांचं वैशिष्टय...
सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हटले की सर्वात दीर्घकाळ प्रभावी कार्य करणारे शिवाजीराव नाईक साहेब यांचे नाव प्रत्येक सांगलीकरांच्या डोळ्यासमोर येते.आता सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हटले की अभिजीत राऊत हे नाव डोळ्यासमोर येईल.ही नीवे समोर येतात ती केवळ सर्वाधिक काळ काम केले म्हणून नाही तर आपण केलेल्या लोकाभिमुख कार्यामुळे.

आपण गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषदेस एका वेगळ्या उंचीवर पोहचवले.नेहमी जिल्हाधिकारी कार्यालय हे सर्व बाबीचे केंद्रस्थान.मात्र कोरोना आपत्तीत आपण जिल्हा परिषद यंत्रणा किती महत्वाची व ती किती सक्षम कार्य करते हे सिद्ध केले.म्हणूनच जळगाव मध्ये कोरोना परिस्थिती थोडी बिघडत असून ती नियंत्रणात आणण्याची जबाबदारीच जिल्हाधिकारी म्हणून शासनाने आपल्याकडे दिली आहे. सांगलीत आपण कोरोना नियंत्रणात राखण्यात ज्या प्रभावीपने जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून कार्य केलं आहे ते पाहता जळगावकरांसाठी कोरोना विरुद्ध लढाईत ' अभि जित ' दूर नहि असेच म्हणावे लागेल. जळगावकर नक्कीच आपल्या नेतृत्वात ही लढाई जिंकतील हा विश्वास आम्हास आहे.

सांगली जिल्ह्यात आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात आपण दिलेले योगदान आम्हासाठी खूपच प्रेरक आहे. झिरो पेंडन्सी, स्वच्छ भारत अभियान, दिव्यांग अभियान, पाणी फाउंडेशन, माझी शाळा अभियान यामाध्यमातून सांगली जिल्हा परिषदे आपल्या नेतृत्वात राज्यात अग्रस्थानावर पोहोचली. राज्यसरकारचा पंचायत राज्य पुरस्कार,केंद्र शासनाचा स्वच्छता दर्पण पुरस्कार मिळाले.जिल्हा परिषद विविध स्तरावर राज्यात प्रथम क्रमांकावर पोहचली.
आज मागे वळून पाहताना काही बाबी डोळ्यासमोर दिसत आहेत. तीन वर्षापूर्वी सप्टेंबर 2017 ला आपण कुमठे येथील  95 वर्षे वय असणारे गुरव बाबा यांच्या घरी भेट दिली.कुमठयाच्या नरसिंह मंदिराजव एकटेच राहणारे गुरव बाबा,या भागात महात्मा गांधी आल्यावर त्यांच्या रॅली मध्ये सहभागी झाल्याची आठवण सांगत त्यांनी शौचालय बांधण्याची इच्छा व्यक्त केली. आणि स्वच्छता पंधरवाड्यातील सेवा दिवसाचे औचित्य साधून आपण स्वतः (जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी) तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता आणि SBM ची टीम त्यांच्या दारी पोहोचला. श्रमदान करून शौचालयाच्या 2 खड्डयांचे खोदकाम सुरु केले.स्वतः हातात टिकाव फावडे घेवून स्वच्छता मिशन मध्ये कृतीयुक्त सहभाग घेणारे सीईओ आम्ही पहिल्यांदा पाहत होतो.

दिव्यांग अभियान तर आपले एक अत्यंत प्रभावशाली कार्य.. जिल्ह्यातील दिव्यांगाना स्वावलंबी बनवत त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना सक्षम करण्याची आपली धडपड अनुभवली.

मतदार जागृती अभियानात ही जिल्हाभर विविध उपक्रम राबवत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी योगदान दिले.स्वतः जिल्ह्यातील गावागावात पोहचण्याचा प्रयत्न केला. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी प्रभावी संयोजन केले दिव्यांगांना सन्मान देण्याचा सदोदित प्रयत्न केला. दिव्यांग मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या कार्याची पोहच दिली.

शिक्षक व एक संघटना प्रतिनिधी म्हणून खालील महत्वाच्या बाबी ज्या आपल्यामुळे झाल्या त्याचा विशेष उल्लेख करावा वाटतो. जिल्ह्यातील प्राथमिक शाळा समृद्ध व सक्षम शाळा बनवण्यासाठी माझी शाळा अभियान सुरू करत शिक्षकांना प्रेरित केले.आपल्या पहिल्या भेटीत जिल्हा परिषद शाळांच्या सक्षमीकरण बाबत बरेच मुद्दे सुचवताना या सगळ्या बाबी व्हायला वेळ लागेल. पण काही बाबी तरी आपल्या कार्यकाळात व्हाव्यात.ही आपेक्षा तेव्हा व्यक्त केली होती. पण आज सांगायला अभिमान वाटतो. त्यावेळी लिखित स्वरूपात दिलेल्या बाबीमधील बहुतांश बाबी आपण पूर्णत्वास पोहचवल्या. शाळा व शिक्षक या दोघांना सक्षम करण्यात महत्वाची भूमिका बजावली.त्यामध्ये इयत्ता चौथी व सातवीच्या मुलांच्यासाठी जिल्हास्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला,सेवाभावी संस्थांचे मदतीने  शिक्षकांना दर्जेदार प्रशिक्षण दिले,शिक्षकांच्या प्रशासकीय अडचणी त्यामध्ये चाळीस हजारापर्यंत मेडिकल बिल मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना दिले, शिक्षण सेवक कालावधी हाच परिविक्षाधीन समजण्यात यावा याबाबत परिपत्रक काढले.

ऑनलाईन जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची अचूक अमलबजावणी केली ती असामान्य होती. छोट्या छोट्या मुद्यांसाठी अनेक लोक वारंवार आपल्यापर्यंत येत होते व आपण सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या,सोडवल्या. रॅण्डम राऊंड मध्ये मूळ गावापासून दूर गेलेल्या शिक्षक भगिनींना भावाप्रमाणे ऐकून घेवून त्यांना मिळालेल्या शाळेत चांगले काम करण्यास प्रेरित केले.शासनास ही बदली प्रक्रियेतील सुधारणा सुचवत गैरसोय झालेल्यांची पुन्हा शासन नियमानुसार सोय केली.

गेल्या तीन वर्षांत पारदर्शकता काय असते हे क्षणोक्षणी जाणवले.अनेकदा काही ठिकाणी जुन्या सवयी मुळे लोकांची अडवणूक व्हायची पण आपण,जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख,उपाध्यक्ष सुहास भैय्या बाबर यांनी या काही जणांच्या सवयी मोडल्या.सिस्टीम बदलने शक्य नाही पण आहे त्या सिस्टीम कडून चांगले कामा करवून घेणे शक्य आहे आणि ते करून दाखवणारी आपली कार्यपद्धत नक्कीच आदर्श आहे.

अंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे व हजर झालेल्या शिक्षकांना आस्थापना देणे म्हणजे खूप मोठा विषय...पण सांगलीतून आपल्या काळात बदली होऊन गेलेला प्रत्येक शिक्षक व सांगली जिल्हा परिषदेत हजर झालेला प्रत्येक शिक्षक आपल्याला पारदर्शक कारभाराबद्दल लाख लाख धन्यवाद देतोय.त्यांच्यासाठी आपण देवच आहात.जत मधून एकवेळ बदली झालेल्या 91 शिक्षकांना सोडले जात नव्हते.त्यावेळी या सर्व शिक्षकांचे बदली आदेश घेवून संबंधिताना जिल्हा परिषदेत बोलवून तेथून या शिक्षकांना तातडीने कार्यमुक्त करण्याबाबत गट विकास अधिकारी याना आदेश देत या शिक्षकांना विना त्रास कार्यमुक्त केले.आलेल्या प्रत्येक शिक्षकाला स्क्रीन वर पारदर्शी पद्धतीने समुपदेशन करत आदेश दिले.

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती हा तर आमच्यासाठी आपल्याकडून खूप काही शिकण्याचा प्रसंग. तंत्रज्ञानाचा वापर करत प्रशासनात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी आपण आग्रही. सातवा वेतन आयोग लागल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चितीसाठी एक एक्सेल टूल जिल्हा परिषद कडून मोफत देवू व त्याची निर्मिती संघटन कडून करण्याचा मनोदय आपल्या समोर व्यक्त केला.आपण क्षणाचा ही विलंब न लावता त्यास सहमती दिली. प्रत्येक बाबीचा विचार करून अचूक एक्सेल पी. डी.शिंदे सरांनी तयार केले.अनेक लोक ते बरोबर असून ही फुकट देत असल्याने ते स्वीकारण्यास टाळाटाळ करत होते.अनेक गणिते मोफत ने बदलणार होती. आपण ठामपने आमच्या या प्रामाणिक कार्यास बळ दिले.जिल्ह्यात तसेच राज्यात हजारो कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती अचूक व मोफत होण्यास मदत झाली ती आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास व दिलेली संधी यामुळे.

सातवा वेतन आयोग नुसार जुलै विकल्प  2016 पूर्वीच्या कर्मचाऱ्यास घेता येणार नाही असे वित्त विभागाचे ठाम मत होते.पण जुलै विकल्प काहीजणांना फायदेशीर असून तो घेता येतो. ही आमची भूमिका होती. याबाबत शासन आदेश, स्पष्टीकरण आपण स्वतः समजून घेतले. यासंदर्भात आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना अधिक अचूकता यावी म्हणून सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती बाबत अमरावती येथे प्रकाशित झालेले एक पुस्तक स्वतः मागवून घेवून आम्हाला अभ्यासण्यासाठी दिले.पुढे जुलै विकल्प बाबत शासनास आपण मार्गदर्शन मागवण्यास सांगितले आणि जुलै विकल्प घेता येतो याबाबत स्पष्टीकरण शासन आदेश आला. त्यानुसार जिल्ह्यातील व राज्यभरातील 2010/11 मध्ये लागलेले शिक्षकांना एक वेतन वाढीचा लाभ मिळाला ही बाब आमच्या साठी खूप महत्वाची होती.हे केवळ आपल्यामुळे शक्य झाले.राज्यभर याचा लाभ झाला.हे फार कमी जणांना माहीत असेल यामागे आपले योगदान किती महत्वपूर्ण होते.

शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत 23 ऑक्टोबर 2017 ला शासन आदेश निर्गमित झाला आणि राज्यभरातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुरीचा प्रवास थांबला.पण आपण राज्यात पहिल्यांदा सांगली जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केली.आपली प्रक्रियेचा अभ्यास करून राज्यभर पुन्हा अनेक जिल्हा परिषदेत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर केल्या.प्रशासकीय प्रमुख म्हणून धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत आपण कधीच मागे सरला नाही व त्याचा लाभ सर्वांना मिळाला.



झिरो पेंडन्सी प्रभावीपणे राबवत. जिल्हा परिषदेत फाईल चे सुसूत्रीकरण केले.व सर्वाधिक रद्दी बाहेर काढणारे अधिकारी म्हणून ही आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली.नाहीतर बिन कामाच्या हजारो कागदात कामाची कागदे सापडत नव्हती. अनेक दिरंगाई करणाऱ्या लोकांचे सर्जिकल स्ट्राईक ही केले.पण कारवाई नाही केली.तर कार्यवाही करायला प्रवृत्त केले.अनेकदा कारवाई करताना सदर बाबीला प्रसिद्धी देणे टाळले कारण कारवाई होणाऱ्या संबंधिताच्या कुटुंबाचा त्याच्या मानसिक स्थितीचा विचार यामागे आपण करत होता.

इतक्या बाबी आहेत की लिहावे तेवढे थोडे आहे.आपण स्वतः NPS धारक आहात व आम्हा DCPS धारकांचा प्रश्न आपण नेहमी समजून त्याबाबत नेहमी सहकार्य केले. *कै.राजू सातपुते यांच्या पत्नीस अनुकंपा अंतर्गत एका वर्षाच्या आत नेमणूक देवून न्याय दिला.आता आपली नुकतीच 11 जून रोजी भेट घेतली त्यामध्ये नानासो कोरे सरांच्या विमा व अनुकंपा,DCPS रक्कम बाबत ही अत्यंत तातडीने कार्यवाही बाबत निर्देश दिले.

राष्ट्रीयकृत बँकेत पगार झाल्यास सॅलरी पॅकेज अंतर्गत विमा संरक्षण मिळते. शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेत व्हावेत ही मागणी मान्य करत शिक्षकांना त्यांचा पगार कोणत्या बँकेत घ्यावा त्याचे स्वातंत्र्य आहे असे स्पष्ट केले.थोड्या दिवसात शिक्षक राष्ट्रीयकृत बँकेत पगार घेतील ते आपल्या मुळे.कारण 13 मार्च ला याबाबत शासन आदेश आला असला तरी शिक्षकांचे पगार सीएमपी प्रणाली ने थेट व्हावेत ही आपली भूमिका नेहमी होती.

असंख्य छोटे मोठे अनुभव आहेत जेथे असे होतच नाही असे म्हटले जायचे. तेथे हो असे होऊ शकते. नव्हे होते. हे आपण आपल्या कार्यपद्धतीने दाखवले. जिल्हा परिषद कर्मचारी क्रिडा स्पर्धात स्वतः सहभाग घेत जान आणली.यावर्षीचा पत्रकार संघासोबत आपला सामना पाहत त्यामध्ये कॉमेन्ट्री करत असताना घेतलेला आनंद नक्कीच अविस्मरणीय व सदैव स्मरणात राहील.मल्लेवाडी या आमच्या गावातील मतदार जागृती कार्यक्रमात आपण स्वतः लावलेली उपस्थिती..आमच्या गायकवाड चव्हाण मळा शाळेस आपण दोन वेळ भेट दिली.आमच्या कामाला दिलेले प्रोत्साहन खूप प्रेरणा देणारे.

काल रात्री 11 वाजता आदेश आले आणि आज आपण जळगाव जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारत आहात. आपली जिल्हाधिकारी पदी झालेली बढती आमच्यासाठी आनंददायी क्षण.....धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी व अधिक लोकांना न्याय देण्याची संधी यानिमित्ताने आपणास आहे.जळगावकर नक्कीच भाग्यशाली आहेत त्यांना आपल्यासारखे संवेदनशील,कार्यतत्पर जिल्हाधिकारी लाभले.... सांगलीकर सर्वांना आपण हवे आहात.पण बदली, बढती हा सेवेचा भाग.सर्वाधिक तीन वर्षे पेक्षा अधिक कार्यकाळ सीईओ पदावर राहणारे आपल्यासारखे सीईओ मिळणे आम्हा सर्वांचे भाग्य.जळगाव मधील स्थिती नियंत्रणात आणण्यात आपल्याला लवकर यश मिळो या आमच्याकडून मनापासून सदिच्छा...

शेवटी सांगलीकर म्हणून यावर्षीच्या जिल्हा परिषद कर्मचारी संस्कृती कार्यक्रमात आपण गायलेल्या गीताच्या ओळी आठवतात... कही बिते ना ये राते, कही बिते ना ये दिन...नक्कीच आम्ही आपण दाखवलेल्या मार्गावर पुढे जात सामन्यांच्या जिल्हा परिषद शाळा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत राहू...

साहेब  आपली कमी आम्हाला क्षणोक्षणी जाणवत राहील....
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
आपला,
अमोल शिंदे
सहाय्यक शिक्षक
जिल्हा परिषद शाळा गायकवाड चव्हाण मळा आरग ता.मिरज जि.सांगली
9420453475

तथा

जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475

2 comments:

  1. धन्यवाद साहेब👍आपणांस मनपूर्वक शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete